मुंबई : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईही आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांनी येत्या शुक्रवार, २४ जुलै रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सायंकाळी 4 वाजता एकत्र जमण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे. सोमवार, २० जुलै रोजी दिल्ली सीकेपीच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यी जखमी झाले. त्यामुळे सरकारच्या क्रूर दडपशाही आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आदित्य ठाकरेंनी आंदोलनाचे आयोजन केले आहे. तसेच वन नेशन वन इमोशन, या ब्रीद वाक्याखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याने पक्षीय झेंडे न आणता सर्व नागरिक, सर्व पक्ष आणि सर्व विचारसरणीच्या लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी एक्स पोस्टद्वारे दिली आहे.
? One Nation, One Emotion! Join us at Chhatrapati Shivaji Maharaj Park on 24th July, Friday!
4 pm onwards as we unite under the Tiranga to sing our National Anthem in one voice at 5 pm. This peaceful protest is against the brutal oppression in Delhi, the detentions of… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2026
काय म्हटले आहे पोस्टमध्ये –
एक राष्ट्र, एक भावना!
शुक्रवार, २४ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा!
दुपारी ४ वाजल्यापासून आपण एकत्र जमू आणि सायंकाळी ५ वाजता तिरंग्याच्या साक्षीने एकसुरात राष्ट्रगीत गाऊ.
हे शांततापूर्ण आंदोलन दिल्लीतील क्रूर दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या विरोधात आहे; तसेच देशासाठी लढा देणाऱ्या शूर तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, हे दर्शवण्यासाठी हे आंदोलन आहे.
जर तुम्ही @Wangchuk66, @abhijeet_dipke आणि जंतर-मंतरवरील त्या सर्व आंदोलकांच्या पाठीशी उभे असाल, तर नक्की या.
तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना आंदोलन करताना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले किंवा अटक करण्यात आली, त्या कृतीचा जर तुम्हाला निषेध वाटत असेल, तर नक्की या – कारण जर त्यांच्यासोबत असे घडू शकते, तर उद्या तुमच्यासोबतही हे नक्कीच घडू शकते.
आंदोलनातील महिला आणि पुरुषांविरुद्ध सत्ताधारी व्यवस्थेने ज्या रानटीपणाने बळाचा वापर केला, त्या क्रूरतेचा निषेध करण्यासाठी नक्की या.
हे सर्व देशभक्तांचे शांततापूर्ण आंदोलन आहे – हातात तिरंगा घेऊन, जागृत झालेल्या देशासाठी आणि राष्ट्रगीत गाण्यासाठी आपण एकत्र येत आहोत.
देशभक्ती आणि देशावरील प्रेम म्हणजे योग्य प्रश्न विचारणे आणि जेव्हा सत्तेतील लोक देशाची सेवा करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा त्यांच्याकडून उत्तरदायित्वाची (जबाबदारीची) मागणी करणे होय.
सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्ष आणि विचारसरणींचे लोक (कोणत्याही पक्षाचे झेंडे न वापरता) आणि ज्यांना भारतीय तरुणांना अधिक चांगले भविष्य मिळावे असे वाटते, अशा सर्वांना आम्ही आमंत्रित करत आहोत.
सर्व विचारसरणींच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांचा हा आवाज आहे.
या!
जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम!