मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना रामलल्लांच्या दर्शनासाठी आलेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा आहेत. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारच नाही, तर भाजपचे मंत्री आणि नेतेही शिंदेसोबत आहेत. गिरीश महाजन, संजय कुटे, मोहित कंबोज, राम शिंदेही शिंदेंच्या शिवसेनेसोबत आलेत. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांनी रामराज्यावर बोलू नये, आधी रामायण वाचावे असा टोला शिवसेना खासदार मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. तसेच ज्यांनी सत्तेसाठी स्वतःचे कुटुंब तोडले, आपल्या भावाला घराबाहेर काढले त्यांनीही रामराज्यावर बोलू नये असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंवर केला. श्रीकांत शिंदे म्हणाले, जे टीका करत आहेत त्यांनी आधी रामायण वाचावे. रामराज्य कोण चालवत होते आणि रावणराज्य कोण चालवत आहे हे जनतेला माहित आहे. गेली अडिच वर्षे तुम्ही रावणराज्य चालवले, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला अयोध्येतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्यांना हनुमान चालिसा वाचायची होती त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले, कंगना राणावतचे घर तोडले, पालघर साधु हत्याकांडाच्या आरोपींना तुम्ही शोधू शकले नाही, बॉम्स्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंध असणाऱ्या जेलमध्ये गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकला नाहीत, हे रामराज्य आहे का? महाराष्ट्राच दुर्भाग्य याच्यापेक्षा अधिक काय असणार. आणि हे आम्हाला रामराज्य कोणते आणि रावणराज्य कोणते हे शिकवत आहेत, यांनी एकदा वाल्मिकीचे रामायण वाचावे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, कुठेतरी डायलॉगबाजी केली की प्राण जाये पर वचन न जाये, तर वचन कोणी तोडले? प्रभु श्रीराम वनवासात जायला सांगितले तेव्हा ते निघून गेले. सत्तेसाठी ते चिटकून राहिले नाही. यांनी आपल्या भावाला घराबाहेर पडले. कोण आहे यांच्या कुटुंबात. आम्ही येथे राजकारण करायला आलेलो नाही. दर्शन करायला आलेलो आहोत.