कुडाळ : मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कुडाळ तालुक्यातील घोटगे येथे विकासकामाच्या कार्यक्रमावेळी आमदार निलेश राणे यांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी लॉरेन्स मान्येकर यांच्यावर विकासकामांवरून जोरदार टीका केली. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणी निलेश राणे यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर टीका करताना घोटगे गावातील श्रेयवादावरून तिथल्या स्थानिक भाजप पदाधिकारी लॉरेन्स मान्येकर यांनी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाणांचा फोटो लावला म्हणून मान्येकर यांना भरसभेत शिवीगाळ केली आणि त्यांचा ‘बंदोबस्त’ करा, असे वक्तव्य केल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला. यावर आमदार निलेश राणे यांनी घोटगे गावातील लॉरेन्स मान्येकर यांच्यावर “धर्मांतर”करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
वैभव नाईक यांच्यावर टीका करताना म्हटले की, वैभव नाईक अशा ‘धर्मांतर करणाऱ्या’ व्यक्तीला पाठिंबा का देत आहेत? तसेच वैभव नाईक यांनी आपल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल निलेश राणेंनी त्यांचे आभार मानले. वैभव नाईक यांना मतदारसंघातील विकासकामांऐवजी ‘व्हिडीओ व्हायरल करण्या’मध्ये जास्त रस असल्याची टीका निलेश राणे यांनी केली. तसेच मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेत वैभव नाईक यांचा संबंध असल्याचा पुन्हा एकदा आरोप निलेश राणे यांनी करताना तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशी केली नाही, म्हणूनच वैभव नाईक वाचले, असा खळबळजनक आरोप आमदार निलेश राणे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर केला आहे. एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिंदे शिवसेना आणि ठाकरे सेना यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहेत.