आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनल सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. भारताने इंग्लंडवर 7 धावांनी थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. दरम्यान यावेळी देखील अभिषेक शर्माने केवळ 7 चेंडूत 9 धावा करत निराशाजनक कामगिरी केली. टी20 विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळत असताना अभिषेक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तसेच पाकिस्तानविरुद्ध खेळताना देखील तो अपयशी ठरला.
त्याचसोबत त्याने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामन्यात 15 धावांच्या खेळीसह चाहत्यांच्या मनात आशा निर्माण केली होती. तर झिम्बाब्वेविरुद्ध 55 धावांची खेळी करत फॉर्मात परतल्याचं पाहायला मिळत होत. अखेर नेदरलँड्सविरुद्ध खेळताना अभिषेकने तीन चेंडूंवर शून्य धावा केल्या. अशातच काल पार पडलेल्या सेमीफायनल सामन्यात देखील त्याची बॅट बॉलला लागलीच नाही. एकूणच आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 7 सामन्यात त्याने फक्त 89 धावा केल्या आहेत. इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याचा स्ट्राईक रेट खूपच घसरला आहे.
एकीकडे टीम इंडिया फायनलमध्ये गेल्याचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे, रविवार, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध भारत या हाय-व्होल्टेज सामन्यात अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल चिंता वाढली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर टीम इंडियाचा कार्णधार सूर्यकुमार यादव याने अभिषेक शर्माच्या फॉर्मबद्दल आणि त्याला पुढे टीममध्ये ठेवायचं की, नाही यावर स्पष्ट भाष्य केलं आहे.
यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, अभिषेक शर्माच्या कामगिरीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी देखील आम्ही त्याला बॅक केलं. आमचे टॉप 3 खेळाडू बदलणार नाहीत. आम्हाला जशी गरज पडेल तसा गेम चेंज करू, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात कोणतेही बदल होणार नाही. अहमदाबादचं पीचवर अखेरचा निर्णय ठरवता येईल. दरम्यान पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये बोलताना सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचं कौतुक केलं.