Abhijeet Dipke: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरवस्थेवर बोट ठेवत कॉकक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी राज्य सरकारविरोधात थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. 'स्कूल ठीक करो' या उपक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची पाहणी करताना त्यांना अत्यंत धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. सेनगाव तालुक्यातील जामदया, करंजाळा आणि लोहगाव येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या खोल्यांमध्ये धान्याचा साठा करून ठेवल्याचे उघडकीस आले. या विदारक परिस्थितीवर अत्यंत संताप व्यक्त करत दीपके यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याविरोधात राज्यव्यापी लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारी शाळेतील पिण्याच्या पाण्याची टाकीवर चढून पाहणी केली.
विद्यार्थ्यांचे अंधारकोठडीत धडे अन् स्वच्छतागृहांची दुरवस्था
पाहणी दरम्यान जामदया गावातील जिल्हा परिषद शाळेत वीज नसल्याने लहान चिमुकल्यांना आणि शिक्षकांना अंधारकोठडीसारख्या वातावरणात अध्यापन करावे लागत असल्याचे स्पष्ट झाले. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. या समस्यांबाबत विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधल्यानंतर दीपके यांनी प्रशासकीय अनास्थेवर जोरदार ताशेरे ओढले. पुढील 15 दिवस राज्यातील विविध शाळांची पाहणी करून एक सर्वसमावेशक अहवाल तयार केला जाईल, आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांना सोबत घेऊन मुंबईत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे दीपके यांनी जाहीर केले.
'अधिकारी अन् नेत्यांची मुले खासगीत, म्हणूनच सरकारी शाळांकडे दुर्लक्ष
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात हिंगोलीतील लिंबाळा (मक्ता) येथील शाळेला भेट देऊन दीपके यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांविरोधात आवाज उठवला होता. सरकारच्या शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका करताना ते म्हणाले की, "लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुले महागड्या खासगी शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना गरीब आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही पर्वा उरलेली नाही." शिक्षकांची कमतरता, ढासळलेल्या इमारती आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे सरकारी शाळांचा बोजवारा उडाला आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी शिक्षणमंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.