सध्या जिकडे तिकडे निवडणुकींचं बिगुल वाजत आहे. काल नुकताच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला ज्यात सकाळपासून एनडीएची आघाडी असल्याच पाहायला मिळाल. सुरुवातीपासूनच बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत प्रचंड चुरस पाहायला मिळाली आणि अखेर भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं. यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेच आणि नेत्यांच लक्ष्य नगरपालिका, महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलं आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून राज्यभरात नगरपालिका, महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून अर्ज भरण्याची मुदत अवघे काही दिवस उरली आहे.
राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच राजकीयवर्तूळातून आणि मनोरंजन क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकारणात उडी मारली असली तरी राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा आणि विधानसभा यांसारख्या निवडणुकांमध्ये दणदणीत पराभव मिळवल्यानंतरही अभिजीत बिचुकले यांनी हार मानली नाही. आता ते नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात रणशिंग फुंकणार आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे.
यावेळी अभिजीत बिचुकले भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात नगराध्यक्ष पदाच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत बिचुकले म्हणाले की, “याठिकाणी जीवनामध्ये प्रथमता मी नगराध्यक्षपदासाठी पहिल्यांदा अर्ज सादर केला. त्याच प्रथम कारण, नगरपालिका ही माझी मातृ संस्था आहे. नगरपालिकेमध्येनोकरी करत असताना काही नालायक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हारामगिरी करून मला कामावरून काढलं. कामावरुन काढण्याचा मुद्दा होता की, माझ्या सौभाग्यवती अलंकृता बिचुकले यांच्या प्रचारामध्ये दिसलो. एवढा मोठा अन्याय माझ्यावर नगरपालिकेच्या मातृ संस्थेमध्ये झाला आहे आणि त्या नगरपालिकेतील सगळी अल्ली-पिल्ली मग ती कोणीही असूदे त्या सगळ्यांना मला आता बाहेर काढायचं आहे. ‘डु ऑर डाय’ सातारकरांना एक सुचना करु इच्छितो साताऱ्यातील खड्डे आणि बागांची दुरावस्था गेले 25 वर्षे मी बघत आहे. 25 वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना लोकसभा विधानसभा निवडणूक लढत असताना आपलं प्रेम मिळालं. पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्षपद माझ्या पदरात टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थाने मी सितारा करून टाकतो. “
तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या. नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली, त्यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.