बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट तयार होतात. काही प्रदर्शित होऊन इतिहास घडवतात, तर काही पूर्ण होऊनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशाच एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची कथा म्हणजे टाइम मशीन. जवळपास 34 वर्षांपूर्वी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झालेले असले तरी हा चित्रपट आजही अपूर्ण म्हणून ओळखला जातो.
हा चित्रपट 1992 साली सुरू झाला होता आणि त्याचे दिग्दर्शन शेखर कपूर करत होते. मुख्य भूमिकेत आमिर खान होता. त्या काळात विज्ञान-काल्पनिक (सायन्स-फिक्शन) विषयांवर आधारित हिंदी चित्रपट फारसे बनत नसल्यामुळे या प्रोजेक्टकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते.
चित्रपटाची कथा टाइम ट्रॅव्हलवर आधारित होती. यात आमिर खान असा तरुण साकारत होता, जो एका वैज्ञानिकाच्या मदतीने भूतकाळात जाऊन त्याच्या आई-वडिलांना भेटतो. हा संकल्पना हॉलीवूडच्या बॅक टू द फ्यूचर या प्रसिद्ध चित्रपटाने प्रेरित असली तरी, ती पूर्णपणे भारतीय पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न होता.
या चित्रपटात त्या काळातील दिग्गज कलाकारांची फळी होती. रेखा, नसीरुद्दीन शाह आणि रवीना टंडन यांसारखे मोठे कलाकार यात सहभागी होते. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे सुमारे 75 ते 80 टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते आणि कोट्यवधी रुपये खर्चही झाले होते.
मात्र, वाढते बजेट हा या चित्रपटासाठी सर्वात मोठा अडथळा ठरला. चित्रीकरणादरम्यान खर्च सतत वाढत गेला आणि अखेर निर्मात्यांनी प्रकल्पातून माघार घेतली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की चित्रपट बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आला. आमिर खान याने परिस्थिती पाहून त्याचे मानधनही न घेण्याचा निर्णय घेतला, तरीही हा चित्रपट वाचू शकला नाही.
या सगळ्यात आणखी एक मोठा धक्का बसला, जेव्हा शेखर कपूर यांनी प्रोजेक्ट अर्धवट सोडून अमेरिका गाठली. त्यांच्या जाण्यानंतर चित्रपट पूर्णपणे ठप्प झाला आणि ‘टाइम मशीन’ कायमची अपूर्ण कथा ठरली.
विशेष म्हणजे, 2008 च्या सुमारास हा चित्रपट पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. शेखर कपूर यांनी नवीन कलाकारांसह हा प्रोजेक्ट सुरू करण्याची कल्पना मांडली होती, ज्यात रणबीर कपूर याचाही समावेश होण्याची चर्चा होती. मात्र, हा प्रयत्नही प्रत्यक्षात येऊ शकला नाही. आजही ‘टाइम मशीन’ हा बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अपूर्ण आणि न प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.