मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज, 8 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी 5 वाजता विधान भवनात पार पडेल. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे निर्देश दिले जातील, असाही अंदाज वर्तवला जात आहे. शिवाय वारीसाठी पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचाही आढावा या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बैठकीत चर्चा होऊ शकते.
दरम्यान, आज, बुधवारी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची बैठकदेखील पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. विधान भवनात दुपारी 3.30 वाजता या बैठकीला सुरुवात होईल. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाई, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक आदी नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात आगामी काळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार असल्यामुळे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. बेळगाव सीमा भागात कन्नडसक्ती यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी खासदार शरद पवार विधान भवनात उपस्थित राहतील. नुकतेच शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.