आज राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले आहे. मात्र मतदानाच्या प्रारंभीच अनेक ठिकाणी तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी समोर आल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशातच हिंगोलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हिंगोलीपासून ते सोलापूरपर्यंत विविध ठिकाणी EVM बंद पडल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच मोठ्याने घोषणा केल्याने मतदानाच्या गुप्ततेचा भंग झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
मतदानासाठी आलेल्या एका महिलेला ईव्हीएमचे बटण कसे दाबायचे याबद्दल त्यांनी थेट सूचना केल्या, तसेच “सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो” अशी घोषणा मतदान केंद्रातच दिली. नियमांच्या स्पष्ट उल्लंघन मानल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची धांदल उडाली. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती.
याचपार्श्वभूमिवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असा अहवाल मागवण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र हिंगोलीमध्ये घडलेल्या एका घटनेने मतदान प्रक्रियेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.