नवी मुंबईतील वाशी शहरात असलेल्या पाळणाघरात १६ महिन्याच्या बाळाला थोबाडीत मारून उचलून बाजूला ढकलल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 16 महिन्याचा चिमुकला एका खुर्चीवर बसला आहे. तेवढ्यात एक महिला टेबलावर त्याच्या समोर जेवणाचे ताट ठेवते. बाळाला त्या ताटात असलेला चमचा घ्यायचा असतो. त्यामुळे महिला ते ताट थोडं पूढं सरकवते. हट्टी बाळ तरीही चमचा घेण्यासाठी पुढं जातं आणि त्याचवेळी त्याच्या जोरदार थोबाडीत बसते. महिला त्याला उचलून बाजूला ढकलते. जोरदार चापट बल्यानं बाळ जोरजोराद रडू लागतं. त्याचे रडण्याचे हुंदके थांबता थांबत नाहीत. या घटनेची बाळाने इतकी धास्ती घेतली असते की, ते घरी गेल्यावर देखील रडतं असतं.
घरी आल्यावर देखील बाळाचं रडणं थांबत नसल्याने सीसीटीव्ही चेक केल्यावर हा प्रकार समोर आलाय. दोन आठवड्यांपासून हे बाळ रात्री झोपत नाही, सतत रडत असल्याने या बाळाला या आधी देखील पाळणा घरातून अशी मारहाण केली असणार असा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी फक्त एनसीआर दाखल केली असल्याने, या पाळणाघरातील इतर दिवसांचे सीसीटीव्ही देखील चेक करता आले नाहीत. पाळणाघर चालकाने पालकांनी तक्रार केल्यावर त्यांचं सीसीटीव्ही आणि मोबाइलचं कनेक्शन बंद केलं आहे. यामुळे याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यास या प्रकरणाच्या पूर्ण चौकशी अंती अजून काही व्हिडिओ समोर आले असते अशी खंत पालकांनी व्यक्त केली आहे.