मुंबई : मुंबईत ठाकरे गटाला (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोठा धक्का देत, ठाकरे यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री अनिल परब यांचे कट्टर समर्थक आणि प्रभाग क्रमांक 92 चे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया यांनी आपल्या 500 हून अधिक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात (शिवसेना) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य प्रवेशामुळे ठाकरे गटाच्या 'मातोश्री'च्या बालेकिल्ल्यातच, म्हणजेच वांद्रे-अंधेरी परिसरात शिंदे गटाची ताकद अधिक बळकट झाली आहे. हा पक्ष प्रवेश 'ऑपरेशन टायगर'चा एक भाग म्हणून ओळखला जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा आता कुठे शांत झाला आहे. राजकीय वातावरण स्थिर होत आहे असं वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय खेळी अधिकच तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत असलेलं एकनाथ शिंदे यांचं 'ऑपरेशन टायगर' अजूनही थांबलेलं नाही. उलट ते अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हक्काच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच 'मातोश्री'च्या अगदी जवळ, वांद्रे परिसरात एक अतिशय मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. वांद्रे येथील शिवसेना शाखा क्रमांक 92 चे धडाडीचे शाखाप्रमुख रामशरण चांदेलिया यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरचा बळ आले आहे. आमदार, खासदारांपासून अगदी शाखाप्रमुख, कार्यकर्त्यांपर्यंत कित्येक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून धनुष्यबाण हाती घेताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर ठाकरेंचे नेते उघडपणे शिंदेच्या नेत्यांची भेट घेत आहेत. कधी गुप्त बैठका, कधी व्यासपीठावर उपस्थिती तर कधी चर्चा अशा विविध मार्गाने ठाकरेंचे नेते शिंदे गटासोबत दिसत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या पक्षात ठाकरेंच्या नेत्यांचे इनकमिंग सुरू असून येत्या काळात आणखी काही नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.