राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात कोरोनाच्या ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या आता २३४३ वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९,९१, ७२८ इतकी झाली आहे.
सोमवारी दिवसभरात राज्यात ३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे . तर राज्यात आज रोजी २,३४३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे सक्रिय रुग्ण ६६३ , तर पुण्यात ६०४, ठाण्यात ४२९ रुग्ण आहेत. तर पालघरमध्ये २८, रायगड ७५ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनासोबतच राज्यात H3N2 व्हायरसचा धोका वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वृद्ध महिलेचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईतही H3N2 आणि H1N1 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक एच३एन२ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत पालिकेच्या रुग्णालयात १४ रुग्ण दाखल आहेत. त्यात ९ रुग्ण ‘एच३ एन२’चे तर ५ रुग्ण ‘एच१ एन१’चे आहेत.