देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. रविवारी एकाच दिवशी एक लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली होती. यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब या तीन राज्यात कोरोनाचा कहर सर्वाधिक असल्याचं दिसून येतंय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली असून या तीन राज्यांत सोमवारी ५० हाय उच्च स्तरीय आरोग्य पथकं पाठवण्यात आली आहेत.
या प्रत्येक पथकामध्ये दोन सदस्य असतील. त्यामध्ये एक इपिडर्मिटोलॉजिस्ट आणि एका आरोग्य तज्ज्ञाचा समावेश असेल. ही पथके महाराष्ट्रातील ३० जिल्हे, छत्तीसगडमधील ११ जिल्हे आणि पंजाबमधील ९ जिल्ह्यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेशी समन्वय साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी, उपलब्ध सुविधा, चाचण्या आणि इतर गोष्टींबद्दलही मार्गदर्शन करणार आहेत. देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी अर्ध्या रुग्णसंख्येची भर ही एकट्या महाराष्ट्रातून पडत आहे.
देशातील कोरोनाचा उद्रेक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. रविवारी बोलताना पंतप्रधानांनी 5 फोल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेन्ट, गाईडलाइन्स नुसार वर्तन आणि लसीकरण या गोष्टींचे गंभीरपणे पालन केल्यास कोरोनाचे संकट नियंत्रणात येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला होता.