नवी दिल्ली, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महायुतीचे नेते यांची बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. दिल्लीत होणार असलेल्या या बैठकीसाठी लवकरच महायुतीचे नेते दिल्लीला रवाना होणार आहेत. या बैठकीआधी उमेदवार निश्चितीसाठी महायुतीचे प्रमुख नेते वेगवेगळ्या मतदारसंघांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करत आहेत.
भाजपाच्या उमेदवारांसाठी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर सकाळपासून बैठका सुरू आहेत. एका मागून एक सतत बैठका सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका घेत आहेत.
महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, रवींद्र गायकवाड, आमदार अभिमन्यू पवार, महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली. माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनीही फडणवीस यांच्याशी चर्चा केली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पण फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला इच्छुकांनी गर्दी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा यांच्यासोबत चर्चा केली. गोविंदा वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याआधी ते काही वर्षांपूर्वी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते.