पुणे, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पण विजय शिवतारे हे पण बारामतीची निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. याच संदर्भात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत होते. पण सात – आठ तास त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही. यानंतर पुण्यात आलेले विजय शिवतारे रुग्णालयात दाखल झाले. तब्येत बरी नसल्यामुळे आराम करण्यासाठी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली. शिवतारेंच्या भेटीसाठी रुग्णालयात मंत्री शंभूराजे देसाई जाऊन आले. शिवतारेंच्या समर्थकांनी तसेच महायुतीच्या पुण्यातील काही नेत्यांनीही शिवतारेंची भेट घेतली.
शिवतारेंची मनस्थिती बिघडली आहे – शिउबाठा
शिवतारेंची मनस्थिती बिघडली आहे, असे शिउबाठाचे विनायक राऊत म्हणाले. त्यांनी शिवतारे लवकर बरे व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त केली.