नवी दिल्ली, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. मशिदीच्या सर्वेक्षणासाठी आयुक्त (कोर्ट कमिशनर) नेमण्याच्या प्रयागराज (अलाहाबाद) उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती देण्यात आली असली तरी या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू ठेवावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने शाही इदगाह मशीद समितीने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर सुनावणी करताना प्रयागराज (अलाहाबाद) उच्च न्यायालयाच्या १४ डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली.
प्रयागराज (अलाहाबाद) उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात वकील आयुक्त (कोर्ट कमिशनर) नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. या अॅडव्होकेट आयुक्तांना मशीद परिसराचे सर्वेक्षण करायचे होते. मशीद समितीच्या वतीने अधिवक्ता तसनीम अहमदी सर्वोच्च न्यायालयात हजर झाल्या. वकिलाने असा युक्तिवाद केला की, मथुरा खटला १९९१ च्या प्रार्थनास्थळांनुसार फेटाळण्याची याचिका अद्याप प्रलंबित असताना उच्च न्यायालय सर्वेक्षणाचे आदेश देऊ शकत नाही. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीस बजावली असून उत्तरही मागवले आहे. मात्र, या प्रकरणावरील सुनावणी उच्च न्यायालयात सुरूच राहणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.