पनवेल, ८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची चौकशी सुरू आहे. सलमानला काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या आल्या होत्या. यामुळे पोलिसांनी घुसखोरी प्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. घुसखोरांकडून पोलिसांनी दोन बनावट ओळखपत्र जप्त केली आहेत.
घुसखोरांनी स्वतःची नावं अजेश कुमार गिल आणि गुरुसेवक अशी सांगितली आहेत. पोलिसांना दिलेल्या माहितीत त्यांनी दोघांपैकी एक जण पंजाबचा तर दुसरा राजस्थानचा रहिवासी असल्याचे सांगितले आहे. पोलीस घुसखोरांचा हेतू जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.