मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांना बुधवारी चौकशीसाठी बोलावले आहे. ८ नोव्हेंबरला त्यांना संचालनालयासमोर हजर राहावे लागणार आहे. कथित शव पिशवी घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. याआधीही दोन वेळा ईडीकडून किशोरी पेडणेकर यांना समन्स बजावण्यात आले होते. पण वेगवेगळी कारणे देत किशोरी पेडणेकर यांनी चौकशीला उपस्थित राहणे टाळले होते. यावेळी तरी किशोरी पेडणेकर चौकशीला उपस्थित राहणार की नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीने बजावले आहे. पी. वेलरासू यांना ईडीने मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची सप्टेंबर महिन्यात २ तास चौकशी केली होती. या कथित फसवणुकीची रक्कम ४९.६३ लाख इतकी असून याप्रकरणी ईडी आणखी काही जणांना चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे.
किशोरी पेडणेकर यांची शव पिशवी खरेदी प्रकरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात दोन तास चौकशी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ईसीआयआर दाखल केले होते. ईडीने आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि माजी उपमहापालिका आयुक्त खरेदी, खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक पीव्हीटी आणि कोविड-१९ महामारी दरम्यान चढ्या दराने बॉडी बॅग खरेदी करण्याच्या कथित घोटाळ्यातील अज्ञात इतर सरकारी नोकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती. मात्र, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपकरण्यात आला होता.या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता होती. मात्र किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती.