अंतरवाली सराटी, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मंडल आयोगाने ओबीसी समाजाला चौदा टक्के आरक्षण दिले होते. मग ओबीसींना ३० टक्के आरक्षण कसं काय, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांना नमस्कार करून शपथ घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री शब्दाचे पक्के आहेत. पण आम्हाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण आम्हाला मान्य नाही. कारण, ते टिकतच नाही. किती दिवस तुम्ही माझ्या मराठा समाजावर अन्याय करणार आहात ? किती दिवस माझ्या मराठा समाजाला त्रास सहन करावा लागणार आहे? हे आता आमच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांना हक्काचे आरक्षण कधी मिळणार, असा सवाल जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित केला आहे.