मुंबई २८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतला अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधत माझ्या नादी लागू नका नाही तर तुमचे सर्वांचे कपडे फाडेल, असा थेट इशारा दिला होता. राऊतांच्या या इशाऱ्याला मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत ज्यांचे स्वत:चे कपडे ठिकाणावर नाही, त्यानी ते सांभाळावेत, असा जोरदार टोला संजय राऊतांना लगावला. जळगावमध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली.
संजय राऊतांनी आपले स्वत:चे कपडे सांभाळावेत. कारण त्यांचेच कपडे आज ठिकाणावर दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या कपड्याकडे त्यांनी लक्ष देवू नये, असा खोचक सल्ला गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिला.आम्ही स्थिर लोक आहोत. आमच्यावर गद्दारीचे आरोप झाले, वर्षभर आम्ही ते ऐकले. आम्ही त्यांना कामाने उत्तर देत आहोत. अरे तुम्ही कामाचे बोला रे! तुम्ही पण पालकमंत्री होता, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तू तेरा गल्ला बता, मैं मेरा गल्ला बताता हूं, तुम्ही चार वर्ष पालकमंत्री होता. तुमच्याकडे ९ खाती होती. तसेच, त्यावेळी आजच्यासारखे तीन जणांचे सरकार नव्हते, तेव्हा एकच सरकार होते. आता तर तीन जणांचे सरकार आहे, वर भाजपा, मध्ये कंबर शिवसेना आणि हातपाय राष्ट्रवादीचे, असे चित्र आहे. तरी पण आम्ही तिन्ही जण विकासाची कामे करत आहोत.
राज्यात कमी पडलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे असणार, या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटलांनी सांगितले की, सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी दररोज पाणी देण्यात येते त्या ठिकाणी आता एक दिवसाआड करा. ज्या ठिकाणी एक दिवसाआड पाणी देण्यात येते, त्या ठिकाणी आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा, ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली.