नवी दिल्ली ,२० ऑगस्ट २०२३. प्रतिनिधी: दाक्षिणात्य तसेच हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या हटके अंदाजाची छाप पाडणारे अभिनेते रजनीकांत हे नेहमी त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. काही दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दरम्यान चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी अभिनेते रजनीकांत विविध ठिकाणी दौरे करत आहेत. नुकतेच ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी जेलर चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
अभिनेते रजनीकांत सध्या ३ दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांची भेट घेतली.यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता रजनीकांत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांचे चरण स्पर्श करत आशीर्वाद देखील घेतला आणि हात जोडून त्यांच्या स्वागताला प्रतिसाद दिला.
रजनीकांत यांनी या भेटीचे कारण स्पष्ट करत ते लखनऊमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सोबत चित्रपट बघणार असल्याचे सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी काही वेळ चित्रपटगृहात चित्रपट पहिल्यांनंतर प्रतिक्रिया देखील दिली आहे. ‘माझं पुढील नियोजन असल्याने मला पूर्ण चित्रपट पाहता आला नाही, मात्र जो चित्रपट मी पहिला तो मला आवडला, व नियोजन नसते तर मी संपूर्ण चित्रपट नक्की बघितला असता’ असं ते म्हणाले. रजनीकांत यांचे अनेक चित्रपट मी बघितले आहेत. त्यांच्यात खूप कौशल्य आहे. आणि त्यांची भूमिका चित्रपटांमध्ये फार महत्वाची असते. अशा शब्दात त्यांनी रजनीकांत याने कौतुक केले आहे.