नाशिक, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक शहरात सध्या पोलीस आहेत का? असाच प्रश्न उपस्थित होतोय. कारण शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नाशिक शहर सलग दोन दिवस खुनाच्या घटनेने हादरले आहे.
आज दुपारी नाशिक शहरातील अंबड परिसरातील महालक्ष्मी नगर येथे एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली. मयूर दातीर असे या तरुणाचे नाव असून, मयत हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने आणि आर्थिक कारणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. करुण कडूस्कर, मुकेश मगर आणि रवी आहेर या तिघा संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने हल्ला करत मयूर याचा खून केला. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच पोलीस आरोपींचा देखील शोध घेत आहे. या तिन्ही संशयित आरोपींची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यातील मुकेश मगर याला तडीपार करून नगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.