राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाल्याने अनेक पिकांना फटका बसला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
“राज्यभरात सोमवारी ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीनं महसूल यंत्रणेनं लगेच कामाला लागावं आणि पंचनामे करावेत”, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच ठाणे, कल्याण-डोंबिवली, धुळे, जळगाव या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ठाण्यात होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पावसानं बरसायला सुरुवात केली. तर कल्याण, डोंबिवली, भिवंडीतही पावसानं दिवसभर हजेरी लावली. दुसरीकडे जळगावमध्ये अवकाळी पावसानं आणि धुळे जिल्ह्यात गारपिटीनं पिकांचं मोठं नुकसान केलं आहे.
मात्र मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी चारनंतर अचानक सोसाट्याच्या वारा सुटला होता. वाऱ्यासोबत धूळही हवेत उडाल्याने कल्याण डोंबिवलीत धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं तर मध्य रात्रीच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली.