खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा आरोप राऊत यांनी या पत्रात केला आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धमकी प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनीं म्हटले की, ‘उद्धव ठाकरे गटाचे आणि खासदार संजय राऊत यांना मिळलेल्या धमकी प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे दिले आहे. तसेच “स्टंटबाजीसाठी असे आरोप करत असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल,” असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी राऊतांचं नाव न घेता दिला आहे.
शिंदे यांनी म्हटले की, आमच्याकडे पोलिसांची एक समिती आहे जी सुरक्षेचा आढावा घेते आणि ज्यांना जशी सुरक्षा गरजेची आहे, तशी सुरक्षा दिली जाते.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या जीवाला धोका आहे. मला जीवे मारण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला सुपारी दिली आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर माझी सुरक्षाही काढण्यात आली. याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता तुमच्यापर्यंत ही बाब पोहोचवणं गरजेचं होतं. मला कोणतीही सुरक्षा नको, कारण मी एकटा वाघ आहे.”