सध्या क्रिकेटमध्ये नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. तसेच नव्या खेळाडूंनी आपल्या नावे कोरलेले विक्रम देखील त्यांच्या खेळीतून पाहायला मिळत आहेत. सध्या भारतातील सर्वात तरुण फलंदाज असलेल्या वैभव सूर्यवंशीचं नाव गाजत असताना नुकतचं एक नवीन नाव क्रिकेटविश्वात सर्वांच्या भुवया उंचावत आहे. नुकताच भूतानमधील गेलेफू या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात भूतान आणि म्यानमार यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला.
यावेळी 22 वर्षीय खेळाडूने विश्वविक्रम केला आहे. दरम्यान भूतानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी भूतानने प्रथम फलंदाजी करत म्यानमारसमोर 127 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करत म्यानमार संघ अवघ्या 45 धावांवर आपल्या ताफ्यात परतला यावेळी भूतानच्या 22 वर्षीय सोनम येशेने विश्वविक्रम आपल्या नावे कोरला आहे.
तिने एकटीने चार षटकांत 7 धावा देत म्यानमार संघातील 8 गडी बाद केले आणि संपूर्ण संघाला पाणी पाजले. या सामन्यात भूतानने 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सोनमसमोर म्यानमारचे सर्व फलंदाज ढासाळले. दरम्यान भूटानकडून नामगे चेजेने 45 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकार मारत अर्धशतकी खेळी खेळली. तर नामगे थिनलेने 22 चेंडूत 27 धावा केल्या. म्यानमारकडून त्टेट लिन ओने 12 आणि प्या फ्यो वाईने 10 धावा केल्या. मात्र सोनमने उल्लेखनीय कामगिरी करून या दोन्ही गोलंदाजांना मागे टाकलं आहे.