नागपूर जिल्ह्यातील हत्यासत्रं अजूनही थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. 12 जानेवारी रोजी रात्री एकमेकांपासून काही मिनिटांच्याच अंतरावर असणाऱ्या ठिकाणांवर दोन हत्याकांडं घडली आहेत.
पहिली घटना नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत झिंगाबाई टाकळी परिसरात घडली.
ललित खरे नावाच्या तरुणाची परिसरातील मराठी शाळेजवळ भोसकून हत्या करण्यात आली.
मद्यपान केल्यानंतर झालेल्या भांडणातून ही हत्या झाली आहे.
विशेष म्हणजे घटनास्थळापासून जवळच असलेल्या मानकापूर क्रीडा संकुलात ग्रामीण पोलीस दलाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता.
या सांस्कृतिक कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. क्रीडा संकुलापासून जवळ असलेल्या असलेल्या परिसरात हे हत्याकांड घडले..
दुसरी घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर मध्ये घडली.
अंगद सिंह नावाच्या जिम संचालकाला मोठ्या चाकूने वार करून ठार करण्यात आलं.
‘ऑक्सिजन जिम’चा संचालक असलेल्या अंगद सिंगवर रात्री 9 च्या सुमारास सावनेर मधील नागोबा मंदिराजवळ हल्ला झाला आणि त्याची क्रूरतेने हत्या करण्यात आली.