रत्नागिरी, १८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे विरुद्ध शिउबाठाचे विनायक राऊत विरुद्ध वंचितचे काका जोशी अशी लढत होणार आहे. मुख्य लढत ही भाजपाचे नारायण राणे विरुद्ध शिउबाठाचे विनायक राऊत अशी होणार आहे.
भाजपाने लोकसभा उमेदवारांची तेरावी यादी गुरुवार १८ एप्रिल रोजी जाहीर केली. या यादीतून फक्त एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली. नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे – राऊत आमनेसामने येणार हे स्पष्ट झाले.
याआधी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी शिवसेनेचे किरण सामंत आणि भाजपाचे नारायण राणे हे दोघे उत्सुक होते. यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी यावरुन पेच निर्माण झाला होता. अखेर किरण सामंत यांनी माघार घेतली आणि पेच सुटला. भाजपाने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्र शासनाचे मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू आणि लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतलेले किरण सामंत आता नारायण राणे यांचा प्रचार करणार आहेत. नारायण राणे यांची रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ताकद आहे. शिवाय केंद्रीय मंत्री म्हणून केलेल्या कामाचा फायदा त्यांना निवडणुकीत होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राणेंची बाजू वरचढ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नारायण राणे यांची राजकीय कारकिर्द
महाराष्ट्राचे महसूलमंत्री – १९९६
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
जुलै २००५ पर्यंत शिवसेना सदस्य नंतर काँग्रेस सदस्य
महाराष्ट्र शासनाचे मंत्री – फेब्रुवारी २००९ ते ऑक्टोबर २०१४
विधानसभा निवडणुकीत पराभव – २०१४
विधान परिषद सदस्य – जुलै २०१६ ते सप्टेंबर २०१७
‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या पक्षाची स्थापना – २०१७
भाजपाकडून राज्यसभा सदस्य – एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२४
‘महाराष्ट्र स्वाभिमान’ भाजपात विलीन – ऑक्टोबर २०१९
केंद्रात मंत्री – जुलै २०२१ पासून
विनायक राऊत यांची कारकिर्द
१९८५ ते १९९२ – कौन्सिलर, बीएमसी, मुंबई
१९९९ ते २००४ – सदस्य, महाराष्ट्र विधानसभा
२००५ – अखिल भारतीय पक्ष सचिव, शिवसेना
२०१२ ते २०१४ – सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
२०१४ – १६ व्या लोकसभेसाठी निवडून आले
२०१९ – १७ व्या लोकसभेसाठी निवडून आले
२०१९ – लोकसभा शिवसेना नेते