कोलकाता, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांचा कूचबिहारचा दौरा निवडणूक आयोगाने रोखला आहे. कूचबिहारमध्ये शुक्रवार १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानावर कळत नकळत प्रभाव पडण्याची शक्यता असल्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यपालांचा दौरा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू आहे. यामुळे निवडणुकीवर प्रभाव टाकणारे निर्णय स्थगित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. या अधिकारात निवडणूक आयोगाने राज्यपालांचा दौरा रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
कायद्यातील तरतुदींनुसार आचारसंहितेच्या काळात देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषय, परराष्ट्र संबंध, आपत्कालीन खर्च आणि दैनंदिन कारभाराशी संबंधित खर्च असे अपवाद वगळता निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणाऱ्या इतर कोणत्याही सरकारी निर्णयांना रोखण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे.