पुणे, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : पवार विरुद्ध पवार अशा बारामतीची लढाई आता मूळ पवारपर्यंत आलीय. लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या, असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन सुनेत्रा पवार मूळ पवार नाहीत, असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. शरद पवार यांच्या या वक्तव्याने सून मुलगी नसते ? असा प्रश्न उपस्थित होतोय…
बारामतीच्या प्रचार सभेतून अजित पवारांनी लेकीला निवडून दिलं, आता सूनेला निवडून द्या म्हणत सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. मात्र शरद पवारांनी सुनेत्रा पवारांना त्या बाहेरच्या असल्याचं म्हटलंय. मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असल्याचं पवार म्हणाले. शरद पवारांच्या वक्तव्याचे राज्यात पडसाद उमटले… राज्यभरातून महिलांमध्ये संतापाची लाट उसळली… संतप्त महिलांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे… सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांच्या निशाण्यावर शरद पवार आहेत.
सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. यासाठी त्या सासुरवाशीणीने केलेला त्याग शरद पवारांनी मातीमोल ठरवल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. तर पवार कुटुंबाचा वाद बारामतीकरांवर लादला जात असल्याचे वक्तव्य तृप्ती देसाईंनी केले. शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ज्योती वाघमारे यांनीही सुनेचा ‘बाहेरच्या पवार’ असा उल्लेख केल्याप्रकरणी शरद पवारांवर टीका केली.
कोण आहेत सुनेत्रा पवार ?
सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी आहेत.
मूळच्या धाराशीवच्या तेर गावच्या आहेत.
राजकीय घराण्यातील आहेत, पद्मसिंह पाटलांच्या बहीण आहेत.
वडिलांकडून नाव सुनेत्रा बाजीराव पाटील, आई द्रौपदी पाटील.
परंपरेप्रमाणं लग्नानंतर सुनेत्रा पाटील या सुनेत्रा पवार झाल्यात.