नाशिक, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन बावीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. त्यापूर्वी दोन महिन्यांपासून सुरू असलेला महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने जवळपास राज्यातील ४८ पैकी १६ लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्टच आहे. याठिकाणाच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत आहे. असाच एक तिढा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आहे.
एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच कायम आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे उमेदवारीसाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
महायुतीतील नाशिक लोकसभेचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाला जोरदार विरोध झाल्यानंतर महायुतीतील ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र महायुतीत मागील तीन-चार दिवसांपासून शांतता असल्याचे पाहायला मिळते. छगन भुजबळ यांच्या नावावर दिल्लीतून मोहोर उमटल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळांच्या नावाला ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ आणि सकल मराठा समाजाकडून उघड विरोध दर्शवला गेला. छगन भुजबळांच्या नावाला गोडसेंपेक्षाही अधिक विरोध होत असल्याचा अंदाज आल्याने महायुतीने आता नव्या नावांची चाचपणी सुरु केली आहे.
शिवसेनेला नाशिक लोकसभेची जागा मिळेल, असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल का, यावर अजूनही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे राहिली तरी उमेदवार कोण असेल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा असली तरी अजय बोरस्ते यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.
भाजपाकडून आमदार राहुल ढिकले यांच्या देखील नावाची सुरुवातीपासून चर्चा आहे, मात्र राहुल ढिकले हे लोकसभेची निवडणूक लढण्यास सध्या तरी सकारात्मक नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची जागा कायम ठेवत उमेदवार बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
कोण आहेत अजय बोरस्ते ?
भाजपाच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात.
बाळासाहेबांच्या उपस्थितीत भाजपमधून शिवसेनेत.
शिवसेनेत नगरसेवक म्हणून काम केले.
शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी, विरोधी पक्ष नेता अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदावर काम केले.
तिढ्याची प्रमुख कारणे
विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना भाजपाचा विरोध
भाजपाचे नाशकात तीन आमदार, भाजपाचा नाशिकच्या जागेवर दावा
सातारा सोडल्यामुळे राष्ट्रवादीचा सुद्धा नाशिकवर दावा
नाशकात भुजबळांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी आग्रही
भुजबळांना मराठा संघटनांकडून विरोध
नाशिक लोकसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाला असल्याचा दावा कालपर्यंत केला जातं होता.. मात्र भुजबळांच्या नावाला शिवसेना,भाजपाने विरोध केल्याने भुजबळांना उमेदवारी देण्याच्या अडचणीत वाढ झाली असून आता दिल्ली भाजपकडून नाशिक लोकसभेसाठी गाव पातळीवर जाऊन नव्याने सर्वे केला जात आहे. त्यामुळे आता या नव्या सर्वेत भुजबळ, गोडसे की कोणता नवा चेहरा पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सर्वसामान्य शिवसैनिक अशी ओळख असलेल्या राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. विद्यमान खासदार गोडसेंना भाजपकडून होणारा विरोध, छगन भुजबळ यांना सकल मराठा समाजाचा विरोध. त्यामुळे या दोघांच्या नावाची चर्चा मागे पडून आता अजय बोरस्ते यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ना गोडसे ना भुजबळ महायुतीकडून शिवसेनेच्या जागेवर जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे. अजय बोरस्ते यांना उमेदवारी दिल्यास भाजप देखील बोरस्ते यांच्या प्रचारात आघाडीवर असू शकते असे बोलले जाते आहे. तर इतर गटातटाच्या राजकारणाचा बोरस्तेंना फायदाही होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता महायुतीची उमेदवारी ही कोणाला मिळणार हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.