मुंबई, ६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाचा फेब्रुवारीत राजीनामा देणारे बबन घोलप शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. ते शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. घोलप मागील अनेक दिवसांपासून शिउबाठाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांची नाशिकमध्ये ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या पाठिशी उभी राहिल्यास महायुतीचा नाशिकमधील विजय सोपा होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. घोलप यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे शिउबाठाच्या नाशिकमधील राजकारणाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघातून घोलप पाच वेळा निवडून आले आहेत. भगूर नगरपरिषद, देवळाली, शिर्डी, नाशिक शहर आणि ग्रामीण भागात तसेच नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नाशिक रोड, जेलरोड या भागात घोलप यांची ताकद आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघात बाजार समिती, नगरपरिषद येथे पण त्यांची ताकद आहे.