सांगली, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा केला जात असून, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला ही जागा मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, शिउबाठा गटानेही आपला दावा कायम ठेवला आहे.
सांगलीतील लढत
संजयकाका पाटील
उमेदवार, भाजपा
विरुद्ध
चंद्रहार पाटील
उमेदवार शिउबाठा
सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आम्हाला विचारात न घेता शिउबाठा गटाने ही उमेदवारी जाहीर केली असल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे.
शिउबाठा गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांना ती रेटण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. काँग्रेस आणि विशेषतः विशाल पाटील यांच्या अस्तित्वासाठी ही लढाई महत्त्वाची मानली जातेय. वसंतदादा घराण्याला राजकारणातून जाणीवपूर्वक मागे ढकलले जात असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत.
सांगलीमध्ये शिउबाठाच्या मेळाव्यात उद्धव यांनी मविआतील कोणत्याही घटक पक्षाशी चर्चा न करता चंद्रहार पाटील सांगलीचे मविआचे उमेदवार असतील अशी घोषणा करून टाकली होती त्यानंतर काँग्रेसकडून विरोध झाला उद्धव यांनी जरी घोषणा केली तरी अधिकृत यादी जेव्हा येईल त्यात काही बदल होऊ शकतात अशाही चर्चा होत्या पण तसे झाले नाही शिउबाठाच्या अधिकृत यादीतली चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सांगलीतून ठाकरे गटाने उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीच सर्व काही आलबेल नाही, हे अधोरेखित झालंय. तर दुसरीकडे काँग्रेसही सांगलीतून उमेदवार देण्यावर ठाम असल्याचं दिसतंय. अशातच संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील सांगलीतला तणाव पाहता, संजय राऊत सांगलीचा दौरा करणार आहेत. सांगलीतली मविआची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राऊतांच्या दौऱ्यात होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, सांगलीचा उमेदवार मागे घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे सांगलीची जागा सुरुवातीपासून काँग्रेसचीच होती, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीचं नेमकं काय होतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. एकूणच सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरु असल्याचं ठळकपणे अधोरेखित झालंय.
महाविकास आघाडीतसांगलीच्या जागेवरून तिढा वाढतच चालला आहे. ७ मे रोजी इथे मतदान होणार आहे. परंतु अद्याप मविआतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही. त्यामुळे सांगलीचा तिढा सुटेना, मविआत एकमत होईना अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगलीतील काँग्रेस नेत्यांची भूमिका
सांगलीत आज काँग्रेसची परिस्थिती मजबूत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून विशाल पाटील तयारी करतायेत. त्यामुळे हे जागा काँग्रेसला मिळावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे अद्यापही सर्वांच्या चर्चेने इथला उमेदवार जाहीर करावा. १ महिना बाकी आहे. काँग्रेस नेते आणि मविआ संयुक्तपणे निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत सांगलीची जागेबाबत आम्हाला आशा आहे. किती दिवसांत हा निर्णय द्यायचा हे पक्षश्रेष्ठीने ठरवावं. ७ मे ला मतदान आहे. ५ मे रोजी प्रचार थांबेल. आता महायुतीकडून उमेदवार जाहीर होऊन प्रचार सुरू झाला आहे अशी आठवण विश्वजित कदमांनी करून दिली. दरम्यान, ज्यावेळी मविआचे तिन्ही पक्षाचे नेते चर्चेला बसलेले होते. तेव्हा कोल्हापूरच्या बाबतीत छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढणार असतील तर ते जो पक्ष निवडतील ती जागा त्या पक्षाला सोडायची असं ठरलं होते. शाहू महाराजांनी काँग्रेस पक्ष निवडला. काँग्रेसनं घटकपक्षाला विचारून ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे कोल्हापूरचा सांगलीशी संबंध जोडणं योग्य नाही. कोल्हापूर, सांगली इथं आमची ताकद आहे. शाहू महाराजांनी मविआकडून लढणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे असंही कदमांनी स्पष्ट केले.