यवतमाळ, ४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : शिवसेनेच्या नेत्या आणि यवतमाळ-वाशिममध्ये सलग पाच वेळा निवडून आलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली. भावना गवळी यांच्याऐवजी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. शिवसेनेने हिंगोलीतून हेमंत पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या पत्नीला यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देऊ केल्याबद्दल काहीसे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, हेमंत पाटील यांचा पत्ता कट होण्यात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विरोध हे प्रमुख कारण मानले जात आहे. तर भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या आठ सर्वेक्षणांचा नकारात्मक अहवाल हे प्रमुख कारण आहे. नेमकं भावना गवळी यांचं चुकलं कुठे ? पाहुयात…
लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड होण्यापूर्वी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचाही समावेश होता. या सर्वेक्षणात मतदारसंघातील जनमत भावना गवळी यांच्याविरोधात असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून सर्वेक्षणाचे अहवाल दाखवून शिवसेनेवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिममध्ये हाच सर्वेक्षणअहवाल भावना गवळी यांच्या उमेदवारीसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे.
तिकीट का कापले ?
शिवसेनेनं मतदारसंघात स्वतंत्र सर्वेक्षण केले.
सर्वेक्षणात गवळी यांच्याविरोधात वातावरण असल्याचा निष्कर्ष
भावना गवळी यांची मतदारसंघातील निष्क्रियता
मतदारसंघात अनुपस्थिती, असा अनेकांचा अनुभव
यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत वाद
राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत.
गवळी यांना मिळणारी बंजारा मते कमी झाली.
राजश्री पाटलांच्या सभेत भावना गवळी गैरहजर
यवतमाळ-वाशिममधून तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचे गुरुवारी दिसून आले. त्या राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना हजर नव्हत्या. राजश्री पाटील यांचा अर्ज भरतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह संजय राठोड , मदन येरावार, दादा भुसे सह इतर आमदार उपस्थित होते. मात्र, भावना गवळी नामांकनाच्या वेळी देखील गैरहजर होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये येऊनही भावना गवळी आपल्या घरीच थांबल्या होत्या. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी कायम असल्याचे चित्र आहे.
गवळींना वाऱ्यावर सोडणार नाही – शिंदे
राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आपण महायुतीचा अनादर करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.