नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि भाजपाच्या दिलीप घोषना बेताल बडबड भोवली. या दोघांना निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन करून आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यावर काही तासांनंतर सुप्रिया श्रीनेत यांनी एक इन्स्टा पोस्ट केली. यात कंगनाचा एक फोटो पोस्ट करून ‘मंडी मे क्या भाव क्या चल रहा है’ असा प्रश्न सुप्रिया श्रीनेतने विचारला होता. सुप्रियाच्या या पोस्टला कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे. कंगनाने सुप्रिया श्रीनेत दिलेले उत्तर समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागले. यानंतर निवडणूक आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांना नोटीस बजावली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्ष ममता बॅनर्जी ज्या राज्यात विधानसभेच्या प्रचाराला जातात त्या राज्याची मुलगी आहे, असे स्वतःला म्हणवून घेतात. ममता यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत भाजपाच्या दिलीप घोष यांनी सार्वजनिकरित्या बोलताना ममता बॅनर्जी यांना त्यांचे वडील कोण हे एकदा ठरवून घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्यारून निवडणूक आयोगाने दिलीप घोष यांना नोटीस बजावली.
बेताल बडबड भोवली
काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत आणि भाजपाच्या दिलीप घोषना निवडणूक आयोगाची नोटीस
कंगना प्रकरणातली इन्स्टा पोस्ट सुप्रिया श्रीनेतना भोवली
ममतांबाबतचे वक्तव्य दिलीप घोषना भोवले
सारवासारव सुरू
कंगनावरील पोस्टवरून चर्चेला उधाण आले आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी सारवासारव केली. कंगना राणावत ही हिमाचल प्रदेशची मुलगी आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केले. तर दिलीप घोष यांचे वक्तव्य कळताच भाजपाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्ष संस्कृतीला न शोभणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपाने दिलीप घोष यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.