नाशिक, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारीख जाहीर झाल्यानंतर देखील नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अद्याप नाशिक लोकसभा जागेवरून रस्सीखेच सुरूच असल्याचे चित्र आहे… अद्याप या दोन्ही आघाडीमध्ये उमेदवार ठरत नसल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे..
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक मध्ये झालेल्या शिवसेनेच्या एका मेळाव्यात नाशिकची ही जागा शिवसेनेकडे राहील आणि हेमंत गोडसे उमेदवार असतील असे जाहीर केल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू झाला होता.
नाशिकच्या जागेवर भाजपाचाही दावा
महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरल नसल्याने राज्यातील काही जागांवरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना पाहायला मिळत आहे…नाशिक लोकसभा मतदारसंघावरून देखील या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे…गेले २ टर्म नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे निवडून येत आहेत..मात्र अचानक यावेळी भाजपने या जागेवर दावा केल्याने या मतदारसंघात चुरस वाढली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भाजप कार्यालयात थेट घोषणाबाजी करत ही जागा नाशिकला मिळावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन देखील केले.. त्यामुळे नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत आहेत.तर ही जागा आमच्याकडेच हवी अशी भूमिका विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी घेतली आहे. तर भाजपाकडून दिनकर पाटील सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत..
मविआचा नाशकात उमेदवार कोण ?
महाविकास आघाडीत ही जागा शिउबाठाला देण्यात आल्याचे खुद्द शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर देखील स्थानिक राशप नेत्यांनी नाशिकच्या या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे.. शिउबाठापेक्षा राशपची ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघात जास्त असल्याने ही जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा राशपच्या नेत्यांना आहे… काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातले नेते गोकुळ पिंगळे यांना उद्धव गटात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्याचे देखील चर्चा रंगली होती… यामुळे महाविकास आघाडीत देखील नाशिकचा उमेदवार ठरेना अशी परिस्थिती आहे..
शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी केली जात आहे. गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटात प्रवेश देवून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात खल सुरु आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बैठकीच्या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री भागवत कराड उपस्थित होते. पण त्यांच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही.
राज्यात काही लोकसभा मतदारसंघावरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघड्यामधे रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून देखील आता दावे प्रतिदावे केले जात आहेत… त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जागा महायुती आणि महविकासाघडी मध्ये कुणाला सुटतो आणि कुणाला तिकीट मिळतय हे पाहणार आता महत्त्वाचं ठरेल..