नवी दिल्ली, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून बुधवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक असे इच्छुक उमेदवार होते ज्यांना उमेदवारी भाजपाच्या वतीने देण्यात आलेली नाही त्यामुळे आता यादी येऊन २४ तास उलटत नाही तर नेत्यांचं नाराजी नाट्य सुरू झालंय… काहींनी तर लगेच पक्ष बदलण्याची भूमिका सुद्धा घेतली… तिकीट नाही मिळाली तर पक्षच बदला..
भाजपाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे यातील काही उमेदवारांची तिकीट कापण्यात आली असून विद्यमान खासदाराला संधी देण्यात आली नाही. कुणाच्या जागी कुणाला तिकीट देण्यात आलंय पाहुयात…
लोकसभा निवडणूक २०२४, भाजपाची दुसरी यादी
नंदूरबारमधून हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे
जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे
अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस
नागपूरमधन नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार
नांदेडमधून प्रतापराव चिखालीकर, जालन्यातून रावसाहेब दानवे
दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील
मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल, मुंबई ईशान्यमधून मिहीर कोटेचा
पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील
बीडमधून पंकजा मुंडे, लातूरमधून सुधाकर श्रृंगारे
माढ्यातून रणजीत नाईक निंबाळकर, सांगलीतून संजयकाका पाटील
महाराष्ट्रातील २० पैकी १५ उमेदवार जुने तर ५ नवे उमेदवार आहेत
१. जळगाव – उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ
२. ईशान्य मुंबई – मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटेचा
३. उत्तर मुंबई – गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पीयूष गोयल
४. बीड – प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे
५. अकोला – संजय धोत्रे यांच्याऐवजी अनुप धोत्रे
नितीन गडकरी, सुभाष भामरे, रक्षा खडसे, रामदास तडस, कपिल पाटील, संजयकाका पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी
हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता
भाजपाचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपासून दूर आहेत. भाजपाच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांसमोर हरिश्चंद्र चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीत गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे.
निलेश लंके राशपकडून लढण्याची शक्यता
निलेश लंके हे नगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते पण भाजपाची यादी आली आणि त्यात नगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित झाला आता महायुतीला रामराम करून मविआत प्रवेश घेणे आणि मविआ घटक पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणे हाच एकमेव मार्ग नाराज नेत्यांकडे उरतो. निलेश लंके हे गुरुवारी शरद पवारांना भेटले असले तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश झालेला नाही. लंके यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत कारवाई त्यांच्यावर कारवाई केली असती. तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकते. हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांच पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. पण शरद पवार यांनी पक्षप्रवेश न होताच लंके यांना उमेदवारी देऊन टाकली आहे.
मोहिते पाटील राशपकडून लढण्याची शक्यता
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांत अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय. या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येतेय. यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपने राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माढ्यातून रणजित निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता. त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे.