नाशिक, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यात राशपच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना जागा वाटपाबद्दल पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मी त्या मीटिंगमध्ये नसते. जागा वाटपात फार काही अडचणी आहेत असं वाटत नाही. पुढील दोन दिवसात जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया राशप खासदार सुळे यांनी माध्यमांना दिली.
काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर उत्सुक
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. मविआतील सध्याच्या स्थितीवरून काँग्रेस हा आघाडीतला सर्वात मोठा पक्ष झाला आहे. यामुळे जास्त जागांवर लढण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे दिसून येते. याउलट पक्ष फुटीमुळे ताकद कमी झाली तरी शिउबाठा आणि राशप २०१९ मध्ये लढवलेल्या जागा सोडण्यास तयार असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मविआत जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे.