नांदेड, ४ मार्च २०२४, प्रतिनिधी : नांदेड विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची भेट झाली. आदिलाबादहून नांदेडमार्गे चेन्नईला होणार असल्यामुळे पंतप्रधान थोड्या वेळासाठी नांदेडच्या विमानतळावर उतरले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार अशोक चव्हाण यांची भेट झाली. भेट झाली त्यावेळी अशोक चव्हाणांनी राज्यसभेवर जाण्याची संधी दिली म्हणून पंतप्रधान मोदींचे आभार मानले. भेटीत पंतप्रधान मोदी आणि अशोक चव्हाण यांच्यात मराठवाड्यातील राजकारणावरही चर्चा झाल्याचे समजते.
भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण राज्यातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा भाजपाने केलेली नाही. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी जागावाटप आणि उमेदवारांच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे. यामुळे भाजपाने महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.