बारामती, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरून चर्चेला उधाण आले आहे. या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राशपकडून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात अद्याप राशपने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. महाविकास आघाडीमधील जागांच्या वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने जरांगेंना तसेच किमान १५ ओबीसींना आणि किमान तीन मुसलमानांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर मविआच्या इतर घटक पक्षांनी निर्णय घेतलेला नाही. जागा वाटपच जाहीर झाले नसल्यामुळे उमेदवारी जाहीर झालेली नाही. पण सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे त्यांना बारामतीतून राशपकडून तिकीट देण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
