जामताडा, २८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडमध्ये अफवा पसरल्यामुळे रेल्वे मार्गावर दुर्घटना झाली. जामताडा आणि विद्यासागर दरम्यान ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा रेल्वेखाली चिरडले गेल्यामुळे मृत्यू झाला.
जे प्रवासी रेल्वेखाली चिरडले गेले ते आधी अंग एक्सप्रेसमध्ये बसले होते. रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी भराभर गाडीतून उड्या मारल्या. नेमक्या त्याचवेळी शेजारच्या रेल्वे रुळावरून वेगाने झाझा – आसनसोल गाडी आली. या गाडीखाली चिरडल्यामुळे १२ प्रवाशांचा मृत्यू झाला.
अंग एक्सप्रेस ज्या रुळावर होती त्याच्या शेजारच्या रुळावरून बंगळुरू – यशवंतपूर एक्सप्रेस वेगाने जात होती. एक्सप्रेस सुसाट वेगाने गेल्यामुळे दोन रुळांदरम्यान ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातून धूळ उडाली. धूळ उडाली आणि आग लागल्याची अफवा पसरली. ही अफवा ऐकून प्रवाशांनी भराभर गाडीतून उड्या मारल्या आणि शेजारून जाणाऱ्या गाडीखाली चिरडले गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका, पोलीस आणि रेल्वेचे मदत पथक घटनास्थळी रवाना झाले.