नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे असलेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. देशाचे गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार ही निवड झाली. राज्यसभा निवडणुकीत डावलल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचे पुनर्वसन झाले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षाला पाच वर्षांचा कार्यकाळ मिळतो. या नियमानुसार हर्षवर्धन पाटील २०२४ ते २०२९ या पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. भाजपात असलेल्या हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड हा पवार गटासाठी धक्का असल्याची चर्चा आहे.
हर्षवर्धन पाटील यांची राजकीय कारकिर्द
चार वेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आले
राज्याचे सहकार मंत्री म्हणून नऊ वर्षे काम केले
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना या दोन्ही महासंघांचे वरिष्ठ संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले
साखर कारखाना क्षेत्रामध्ये सुधारणा होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले