मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या केलेल्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेतून पत्ता कापण्यात आला आहे. राणेंना लवकरच होणार असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपाने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे या तीन जणांना उमेदवारी दिली आहे.
अशोक चव्हाण हे राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी सोमवारी आमदारकीचा आणि काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि मंगळवारी भाजपात प्रवेश केला. जवळपास ३७ – ३८ वर्षे काम केल्यानंतर काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.
मेधा कुलकर्णी या पुण्यातील भाजपाच्या माजी आमदार आणि निष्ठावान कार्यकर्त्या आहेत.
डॉ. अजित गोपछडे हे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अजित गोपछडे यांच्या निमित्ताने लिंगायत समाजाला भाजपाने प्रतिनिधित्व दिले आहे. तसेच गोपछडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. भाजपाचे बीड जिल्ह्याचे प्रभारी म्हणून ते काम करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांची जडणघडण झाली आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील बोरगाव हे त्यांचं मूळ आहे.
कोण आहेत मेधा कुलकर्णी ?
पुण्यातील मानवंत महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.
पुणे महापालिकेत कोथरुडच्या नगरसेविका म्हणून काम
२०१४ मध्ये कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
त्यावेळी त्या ७० हजार मताधिक्याने जिंकूल आल्या होत्या.
२०१९ मध्ये चंद्रकांत पाटीलांसाठी मेधा कुलकर्णींची उमेदवारी नाकारली.
त्यावेळी चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली.
त्यानंतर मेधा कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा
अनेकदा जाहीरपणे त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
पक्षातील नेत्यांपेक्षा वेगळी भूमिका त्यांनी अनेकदा घेतली.
शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी
शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आले आहेत. ते माजी खासदार आहेत. पण त्यांना उमेदवारी दिल्याच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.