नवी दिल्ली, १२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : रायबरेली मतदारसंघातून सातत्याने जिंकून येणाऱ्या खासदार सोनिया गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने सोनिया गांधी यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. कमलनाथ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नाहीत, असे सांगून मध्य प्रदेश काँग्रेसने राज्यातून सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याचे कळवले आहे. मध्य प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान काँग्रेसनेही राज्यसभेसाठी सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यास इच्छुक असल्याचे कळवले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमधून काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेवर जाईल अशी परिस्थिती आहे. याच कारणामुळे दोन्ही राज्यांतील प्रदेश काँग्रेसने मते फुटू नये यासाठी सोनिया गांधींनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आहे.
राज्यसभेत ५६ पैकी दहा जागांवर विजयाची शक्यता
काँग्रेसकडे असलेल्या आमदारांची संख्या बघता त्यांना मते फुटली नाही तर राज्यसभेतील ५६ पैकी १० जागांवर विजयाची शक्यता वाटत आहे. यात कर्नाटकमधून ३ आणि तेलंगणातून २ जागांव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, बिहार या राज्यांतून प्रत्येकी एका जागेवर विजयाची शाश्वती वाटत आहे.