नाशिक, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : छगन भुजबळ ओबीसी समाजाचे नेते असतील तर नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. ‘नाभिकांची माफी न मागणं भुजबळांची मग्रुरी’, असा खोचक टोला मनोज जरांगे यांनी केला आहे. ओबीसी समाजाने भुजबळांना समज द्यावी, असे जरांगेंनी ओबीसींना इशारा दिला आहे. मनोज जरांगे हे गुरुवारी नाशिक दौरा करणार आहेत.
मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा वाद पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध केला आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र सोडले.
जरांगेंचा भुजबळांना टोला
मराठा क्रांती मोर्चा भुजबळांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांना भेटणार आहेत.. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, भुजबळ राजीनामा देणार नाहीत.. ते घ्यायला बसले आहेत. भुजबळांनी राजीनामा द्यावा अथवा नाही.. त्यात मी पडणार नाही. मी इतक्या खालच्या दर्जाला जाणार नाही. छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. ओबीसी समाजाचा नेता असेल तर माफी मागावी, असे मनोज जरांगे म्हणाले. ते सुद्धा गोरगरिब आहेत. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. त्यांची माफी मागावी. माफी मागितली नाही, त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला. माफी मागणार नाही, असा खोचक टोला यावेळी जरांगेंनी लगावला.