मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) असे नाव दिले आहे. पण हे नाव आले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार यांचे पूर्ण नाव शरद गोविंद पवार असे आहे. पवार श. गों. पवार अशी मराठी सही करायचे. सगळीकडे पवारांचे नाव हे शरद पवार किंवा शरद गोविंद पवार असेच सांगितले जात होते. पण पवार मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा नावात चंद्र या शब्दाचा समावेश झाल्याची चर्चा आहे.
सरकारी कामकाजात मंत्रिमहोदयांचे नाव आदराने घेतले जाते. हे करताना शरद पवारांचे यांचे नाव शरदचंद्र पवार असे आदराने करण्यात आल्याची चर्चा आहे. एरवी कुठेही पवारांनी स्वतःच्या नावात चंद्र या शब्दाचा समावेश केलेला नाही. आता पक्षाचे बारसे करताना पवारांनी जे वेगवेगळे पर्याय दिले त्यातील एक पर्याय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. या पर्यायात ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असा स्पष्ट उल्लेख आहे. यामुळे पहिल्यांदाच पवारांच्या नावात चंद्र नसला तरी त्यांच्या पक्षाच्या नावात चंद्र आला आहे. राष्ट्रवादीत चंद्रोदय झाला आहे.