मुंबई, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपात आमदार रोहित पवार यांची ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू आहे. या चौकशीचा निषेध करण्यासाठी सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांना राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.
प्रतिभा पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात
रोहित पवारांची २४ जानेवारी रोजी ईडी चौकशी झाली होती. या चौकशीच्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे ईडीच्या कार्यालयाजवळच असलेल्या राट्रवादीच्या कार्यालयात दिवसभर बसून होते. रोहितला गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडीने बोलावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात सकाळपासूनच प्रतिभा पवार बसून आहेत.
प्रतिभा पवार या राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या पत्नी आहेत. सार्वजनिक जीवनापासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या प्रतिभा पवार रोहित पवारांच्या निमित्ताने एकदम चर्चेत आल्या आहेत. याआधी जेव्हा शरद पवार यांनी राजीनाम्याची भाषा केली होती त्यावेळी प्रतिभा पवार मंचावर दिसल्या होत्या. यानंतर प्रतिभा पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिसल्या आहेत.
रोहित पवार यांना फक्त मानसिक आधार देण्यासाठी पवार कुटुंबाचे सदस्य राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसत आहेत की त्यामागे वेगळे कारण आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.