मुंबई, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे २० हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबतचा सामंजस्य करार हा अविस्मरणीय क्षण आहे. राज्यात आम्ही आपले स्वागत करतो; असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्यात असलेल्या पोषक वातावरणामुळे गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्रात सध्या अतिविशाल पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी सुमारे ३५ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनीचा ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प राज्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २० हजार रोजगार निर्मिती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.