मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरण्याआधीच काँग्रेसने १८ जानेवारी पासून राज्यात विभागनिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसचा मित्रपक्षांवर कुरघोडीचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेसच्या बैठकांची सुरुवात ही अमरावती विभागापासून होईल. नियोजनानुसार १८ जानेवारी रोजी अमरावती येथे, २० जानेवारी रोजी नागपूर येथे, २३ जानेवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रची बैठक पुणे येथे, कोकण विभागाची २४ जानेवारी रोजी भिवंडी येथे, २७ जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे तर २९ जानेवारी रोजी मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे होणार आहे. बैठकांचे वेळापत्रक जाहीर करून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याची चर्चा आहे.