पुरुलिया, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात तीन साधुंना बेदम मारहाण झाली. उत्तर प्रदेशमधून आलेले हे साधू गंगासागर येथे स्नानासाठी जात होते. जाताना रस्ता चुकले आणि भलत्याच दिशेला गेले. रस्ता चुकलेल्या साधुंनी वाटेत तीन मुलींना बघितले आणि त्यांच्याकडे गंगासागरकडे जाण्याच्या मार्गाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पण साधू त्यांच्या दिशेने येत असल्याचे बघून मुलींचा गैरसमज झाला आणि त्या किंचाळल्या. मुली किंचाळल्याचे ऐकून घटनास्थळी गोळा झालेल्या नागरिकांनी साधुंना अपहरण करण्यासाठी आल्याचे समजून बेदम मारहाण केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून साधुंना वाचवले. साधुंना मारहाण केल्याच्या संशयावरून पोलिसांनी बारा जणांना पकडले आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे. पुरुलिया जिल्हा पोलीस अधीक्षक अभिजीत बॅनर्जी यांनी घटनेची आणि केलेल्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.