मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईत रविवारी दुपारी १२ ते १ या वेळेत ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. याआधी शुक्रवारी आणि शनिवारी पण दुपारी १२ ते १ या वेळेत मुंबईत ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाने मरिन ड्राईव्ह येथे ‘एअर शो’चे आयोजन केले आहे. नागरिक आणि हवाई दल यांच्यात संवाद व्हावा, तरुणांना हवाई दलाकडे आकर्षित करता यावे यासाठी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अधूनमधून ‘एअर शो’चे आयोजन केले जाते. यावेळी मुंबईत ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. सूर्यकिरण एरोबॅटिक डिस्प्ले टीम अर्थात एसकेएटी, सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम, एसयू – ३० एमकेआय सुखोई विमानांचे पथक, आकाशगंगा टीम, सी-१३० विमानातून पॅराट्रूपर्सची कामगिरी हे सर्व बघण्याची संधी ‘एअर शो’च्या निमित्ताने मिळणार आहे. विमानांच्या चित्तथरारक कसरती ‘एअर शो’च्या निमित्ताने दिसतील.